ब्लॉग



धर्मापुरीच्या इतिहासावर नव्याने प्रकाश

धर्मापुरी नगरी प्राचीन काळात वैभवसंपन्न व राजकीय घटनांचे प्रमुख केंद्र होती. हे तेथे आढळलेले शिलालेख तसेच मंदिर व त्यांच्या अवशेषांवरून समजून येते. बाराव्या शतकात कल्याणी चालुक्यांचा मांडलिक मल्लराज दंडणायक हा धर्मापुरी येथून राज्य करत होता. चालुक्यांचे अनेक शिलालेख येथे आढळून आले आहेत. इसवीसनाच्या 11 व 12 व्या शतकात महाराष्ट्र व कर्नाटकच्या बहुतांश भागावर कल्यानीचे चालुक्यांचे वर्चस्व होते. त्यात विक्रमादित्य सहावा हा पराक्रमी राजाने इस 1076 ते 1126 पर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्ष राज्यकारभार केला. त्यानंतर भूलोकमल्ल सोमेश्वर तृतीय याने इस 1138 पर्यंत राज्यकारभार केला. यांचे अनेक मांडलिक राजांवर प्रभुत्व होते. 


धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर येथे 2 कन्नड शिलालेख आढळून आले आहेत. केदारेश्वर मंदिर शिल्पसौंदर्य दृष्टया संपन्न मंदिर आहे. मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देव देवता व सुरसुंदरी आहेत. विष्णूचे अवतार ही आहेत. देवकोष्टकांत वासुदेव, केशव व नृसिंह अशी शिल्पे आहेत. 
मंदिराच्या बाह्य भिंतीवर पत्रलेखिका लिहीत आहे असे दाखवलेल्या शिल्पातील फलकावर एक शिलालेख आहे. तर दुसरा शिलालेख मंदिराच्या उत्तर बाजूस आवारात आहे. दोन्ही शिलालेखांची भाषा व लिपी कन्नड आहे. पहिला शिलालेख चार ओळींचा आहे. त्याचा आशय पुढील प्रमाणे आहे. कैलासपर्वताच्या कीर्ती पेक्षाही उन्नत असे नारायण मंदिर चालुक्य चक्रवर्ती सहावा विक्रमादित्य(विक्रमांक) याने बांधले. या मंदिर प्रदेशातील विशाल पर्वत, शुद्ध सरोवर त्यातील नयनरम्य अशी कमळाची फुले जणू विक्रमदित्याच्या धर्मकार्याची प्रशंसा करणारी आहेत. विक्रमांकाची कीर्ती चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र असे पर्यंत शाश्वत रहावी अशी शुभ कामना करीत एक कवयित्रीने(पत्रलेखिकेने) हा शिलालेख लिहिला. 


शिलालेख अलंकारयुक्त असून प्रकृतीचा जणू विक्रमादित्यच्या धर्मकार्याची प्रशंसा करत असल्याचे दाखवून मानवीकरण अलंकारांचा प्रयोग दिसून येतो. विक्रमांक म्हणजे चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याने नारायण मंदिर बांधले अशी माहिती मिळते मात्र यात काळाचा उल्लेख नसल्याने मंदिर नेमके कधी बांधले हे समजत नाही. विक्रमादित्य सहावा याच्या कारकिर्दीत म्हणजे इस 1076 ते इस 1126 या काळात मंदिर बांधणी झाली असावी. हा भाग पर्वतीय(डोंगराळ) असून येथे स्वच्छ पाण्याचे सरोवर(तलाव) आहेत व त्यात कमळाची फुले आहेत अशे शिलालेखात या परिसराचे वर्णन आले आहे. 


मंदिराच्या उत्तर बाजूस आवारात दुसरा शिलालेख आहे. शिळेची लांबी 3 फूट 8 इंच तर रुंदी 1 फूट 3 इंच आहे. लेखात ऐकून ओळी 21 आहेत. शिळा वरील बाजूस त्रिकोणी असून त्यावर सूर्य, चंद्र, गाय व नृसिंह देवता यांचे अंकन आहे. हा शिलालेख चालुक्य राजा तृतीय सोमेश्वर याच्या राजवटीतील आहे. यात तारखेचा उल्लेख येत असून इंग्रजी कालगणना नुसार ती 11 जुलै 1127 अशी येते. लेखाच्या प्रारंभी भगवान विष्णूची स्तुती करण्यात आली आहे. शिलालेख रचनेच्या वेळी चालुक्य चक्रवर्ती भूलोकमल्ल अर्थात तृतीय सोमेश्वरचा राज्यकारभार होता. शिलालेखात याची अनेक बिरुदे आली असून त्यानंतर त्याचा महासामंताधिपती मल्लरस याची बिरुदे आली आहेत. त्यांनतर बसवदेवरसचा उल्लेख असून हा मल्लरसचा भाचा किंवा जावई असून तो धर्मापुरीचा दंडणायक आहे. त्याने महाचालुक्य विक्रमवर्ष म्हणजे विक्रमादित्य सहाने चालू केलेले राज्य वर्ष 52 च्या प्लवंग संवत्सर श्रावण अमावस्या सोमवार रोजी धर्मापुरीच्या नृसिंह देवाला व तेथे वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना 29 मत्त भूमी दान स्वरूपात दिली. सदर विक्रमवर्ष इ. स. 1127 जुलै 11, सोमवारशी जुळते. या शिलालेखच्या शेवटी शापवचन असून त्याचा अर्थ जो कोणी हे दान अपहरण करेन ती व्यक्ती 60 हजार वर्षांसाठी शेणामध्ये कृमी कीटक होऊन जन्म घेईल असा होतो. शिलालेखाच्या शेवटी "नारायणाय नमः" या स्तुतीने होतो.


वरील दोन्ही शिलालेखांचे अध्ययन व संशोधन केले असता असे लक्षात येते की मंदिराचे निर्माण चालुक्य नृपती सहावा विक्रमादित्य याने केले तर त्याच्या नंतर त्याच्या मुलाच्या म्हणजे तृतीय सोमेश्वर याच्या कारकिर्दीत धर्मापुरीय बसवदेवरस दंडणायक याने या नृसिंह देवाला व वेदाध्ययन करणाऱ्या ब्राम्हण यांना जमीन दान दिल्याचे समजते. वाकडी येथील शिलालेखात(इस 1134) मल्लरस चा उल्लेख असून मात्र त्या वेळी मात्र तो जिवंत नसल्याचे समजते. मात्र या लेखात तो जिवंत असतानाची त्याची बिरुदे खुप काही सांगून जातात. पंचमहाशब्द, महासामंताधिपती, महाप्रचंड दंडणायक अशी बिरुदे त्याचे चालुक्य सत्तेतील महत्त्वाचे स्थान दर्शवतात. 
दोन्ही शिलालेखात हे नारायण मंदिर असल्याचे समजते. काही वेळा मंदिराच्या गर्भगृहात नृसिंह देवाची स्थापना असते व मंदिराला नारायण मंदिर म्हणण्याचा प्रघात असतो. मात्र सध्य घडीस हे केदारेश्वर मंदिर नावाने प्रख्यात असून मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे.
या दोन शिलालेखांच्या नवीन केले गेलेल्या संशोधनाने मंदिराच्या व धर्मापुरीच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे व अपरिचित इतिहास समोर येणास मदत झाली आहे. शिलालेख वाचनात डॉ प्रा रविकुमार नवलगुंडा व प्रा व्ही डी परमशिवमूर्ती यांची तर भाषांतरात डॉ सुजाता शास्त्री यांची मदत झाली. तसेच डॉ प्रा माधवी महाके, प्रतीक सुतार, महेश खाडे, अनिल दुधाने, सायली पलांडे-दातार यांची मदत झाली.

श्री कृष्णा गुडदे
बा रायगड परिवार

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter